Ministry of Information & Broadcasting, Govt. of India | As per IT Rules 2021 – Rule 18

NEET पेपर लीक प्रकरण: नांदेडमध्ये CBI ची मोठी कारवाई, दोन विद्यार्थ्यांची तासन्तास चौकशी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

नांदेड | महाराष्ट्र खबर 24

देशभरात चर्चेत असलेल्या NEET पेपर लीक प्रकरणाच्या तपासात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) नांदेडमध्ये मोठी कारवाई केली आहे. CBI च्या पथकाने शहरातील शिवाजीनगर आणि भाग्यनगर परिसरात छापे टाकून दोन विद्यार्थ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांची सखोल चौकशी केली. या प्रकरणातील संभाव्य नेटवर्क आणि कोचिंग संस्थांशी असलेल्या संबंधांचाही तपास सुरू आहे.

नांदेडमध्ये CBI ची छापेमारी

मिळालेल्या माहितीनुसार, CBI अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना NEET परीक्षेचा प्रश्नपत्रिका कथितरित्या कधी, कुठे आणि कोणामार्फत मिळाली, त्यासाठी किती पैसे देण्यात आले आणि या व्यवहारात कोणते एजंट किंवा मध्यस्थ सहभागी होते, याबाबत अनेक महत्त्वाचे प्रश्न विचारले.ही चौकशी तब्बल सात ते आठ तास चालली. यावेळी अधिकाऱ्यांनी संबंधित कागदपत्रे, मोबाईलमधील माहिती आणि इतर पुराव्यांचीही तपासणी केली.

13 आरोपी आधीच अटकेत

NEET पेपर लीक प्रकरणात CBI ने आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील काही आरोपींचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नांदेड, लातूर आणि आसपासच्या भागातील संभाव्य नेटवर्कवर तपास यंत्रणांचे विशेष लक्ष आहे.

कोचिंग नेटवर्कचीही चौकशी

CBI आता संबंधित विद्यार्थी कोणत्या कोचिंग क्लासशी जोडले होते याचा तपास करत आहे. विशेषतः लातूरमधील चर्चित कोचिंग नेटवर्क आणि इतर शैक्षणिक संस्थांशी त्यांचा काही संबंध होता का, याची माहिती गोळा केली जात आहे.तसेच या प्रकरणात पुणे कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जात असून त्या दिशेनेही तपास सुरू आहे.

पुन्हा चौकशीची शक्यता

तपासादरम्यान समोर येणाऱ्या नव्या माहितीनुसार संबंधित विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. यासाठी CBI चे पथक पुन्हा नांदेडमध्ये येण्याची किंवा संबंधितांना पुण्यात हजर राहण्याचे आदेश देण्याची शक्यता आहे.

आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता

CBI च्या रडारवर नांदेडमधील आणखी काही विद्यार्थी आणि त्यांचे पालक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

और पढ़ें